हि कथा संत जंभेश्वर यांच्या जीवनाची आहे ज्यांनी बिष्णोई पंथाची स्थापना केली होती.
जांबाजी सात-आठ वर्षांचा होता तेव्हापासून गुरांना घेऊन रानात चरायला जायचा . रानातल्या वाटेत एकेदिवशी जांबाजीला एक झाड दिसले . कुणीतरी जातायेता ते झाड ओरबाडले होते . उंटांनी जातायेता पाला ओरबाडला होता. पाला नसलेले, शेंगा नसलेले झाडाचे खुरटे उभे होते. जांबाजीचे सारे मित्र त्या झाडाकडे पाहून पुढे गेले . जांबाजी मात्र त्या झाडाकडे तिथेच थांबला . पाहता पाहता त्याच्या डोळ्यात आश्रू आले .
लाकडाची एक ढिलपी घेऊन त्याने झाडाच्या मुळाभोवतीची जमीन उकरली आणि स्वतःसाठी आणलेले पाणी त्या मुळाशी टाकले. पिण्याचे पाणी राजस्थानात दुर्मिळ होते आणि असे मूल्यवान पाणी जांबाजीने झाडाच्या मुळाशी ओतून दिले - हि कृती बघून त्याचे सर्व मित्र चकित होते .
त्या दिवशी मित्रांनी आपल्याकडचे पाणी थोडे थोडे करून जांबाजीला दिले. पण जांबाजीने त्या लोट्यातील पाणी नाही पिलं. संध्याकाळी घरी परत येतांना जांबाजी त्या झाडापाशी थांबला . त्याने पुन्हा पाणी झाडाला दिले. तो त्याच्या सर्व मित्रांना म्हणाला, "आजपासून हे झाड आपल्या सर्वांचं. राज सकाळी मी या झाडाला पाणी देईन . संध्याकाळी प्रत्येकानं आपल्या लोट्यातील राखलेलं पाणी या झाडाच्या मुळाशी ओतायचे. त्यासाठी लोट्यात थोडं तरी पाणी राखायचे." जांबाजीच्या मित्रांनी होकार दिला.
बघता बघता ते किरटे, खुरटे झाड मोठे झाले. त्याला शेंगा आल्या. बहरलेले झाड दुरून डोळ्यांना सुखावू लागले. त्या झाडाला नाव पडले जांबाजीचे झाड. पण ते झाड होते खेजडीचे. आजही पिपासर गावात गेलात तर त्या झाडाच्या जागी बांधलेला चिरेबंदी ओटा दिसेल . हि घटना इ. स. १४६० च्या आसपासची आहे.
No comments:
Post a Comment